मस्त्स्यासन Matsyasan
योगासनाचा एक प्रकार. मत्स्य म्हणजे मासा. ह्या आसनाची अंतिम स्थिती माशाच्या शरीराप्रमाणे दिसते म्हणून ह्या आसनास मत्स्यासन हे नाव दिले आहे. विपरीतकरणी, सर्वांगासन तसेच हलासन या आसनांना पूरक म्हणून हे आसन करावे. मानेला व पाठीच्या कण्याला पुढे व मागे असे आलटून पालटून वाकविल्याने या आसनात या अवयवांना पूर्ण व्यायाम मिळतो.
कृती : पाठीवर झोपून पद्मासन घालावे किंवा आधी पद्मासन घालून मग पाठीवर पडावे. कोपरांच्या मदतीने मस्तक व धड वर उचलून मागे वाकवावे जेणेकरून पाठीची कमान होईल. मस्तकाचा वरचा भाग जमिनीवर ठेवावा. पाठीची कमान तशीच सांभाळून दोन्ही तर्जन्यांनी त्या-त्या बाजूच्या पायांचे अंगठे पकडावेत. दोन्ही कोपर जमिनीवरच राहतील. शरीर शिथिल ठेवावे. श्वास कोंडून ठेवू नये. आसनाच्या अंतिम स्थितीत डोळे मिटले तरी चालेल. १० ते २० सेंकद आसनात स्थिर राहावे. पुढे हा कालावधी १ मिनिटापर्यंत वाढविता आला तर अधिक उत्तम. आसनस्थितीतून बाहेर येताना आधी अंगठे सोडून पाठ सरळ करावी. हातांचा आधार घेऊन उठून बसावे व पद्मासन सोडावे. पायांचे अंगठे पकडता येत नसल्यास हातांचे पंजे जांघांवर ठेवावेत. पद्मासन करणे शक्य नसेल, तर साधी मांडी घालूनही हे आसन करता येईल.
लाभ : सर्वांगासन वा विपरीतकरणी करताना मानेवर आलेला ताण या आसनाने नाहीसा होतो. हा ताण कंठापाशी पडतो. त्यामुळे तेथील रक्ताभिसरण वाढते. वाढलेल्या रक्तपुरवठ्यामुळे डोळे, कान तसेच गलग्रंथींचे (Thyroid glands) कार्य सुधारते. उदरात वायू साठल्याने दुखत असल्यास मत्स्यासन केल्याने हा त्रास कमी होतो. कृमींचा त्रास होत नाही. फुप्फुसांची क्षमता वाढते. पाठीचा कणा लवचिक होतो.
Source : Google
Post a Comment