पश्चिमोत्तासन Pashchimottasan
एक आसनप्रकार. पश्चिम या संस्कृत शब्दाचा एक अर्थ ‘मागे’ असा आहे. ज्या आसनात शरीराची मागची अर्थात पाठीकडची बाजू ताणली जाते त्याला पश्चिमोत्तानासन असे म्हणतात. ज्या व्यक्तीचा पाठीचा कणा सुदृढ व लवचिक आहे त्या व्यक्तीला हे आसन सहजसाध्य आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी या आसनाचा सराव महत्त्वाचा आहे.
कृती : दोन्ही पाय एकत्र व सरळ ठेवून ताठ बसावे. या स्थितीला दण्डासन असे म्हणतात. ताठ राहून कंबरेत पुढे झुकावे. पुढे वाकून पायांचे अंगठे पकडावेत. मस्तक सावकाश खाली गुडघ्यांकडे आणावे. शक्य असल्यास कपाळ गुढघ्यांना लावावे. शरीर शिथिल ठेवावे. श्वास कोंडून ठेवू नये. आसन स्थिर आणि सुखद असावे. जबरदस्ती करू नये. १ ते ३ मिनिटे अथवा क्षमतेनुसार त्याहीपेक्षा जास्त काळ या आसनात स्थिर राहावे. केवळ स्वास्थ्यरक्षण हा सीमित उद्देश असल्यास हे आसन कमी वेळ केले तरी चालेल. आसनातून बाहेर येताना अंगठे सोडून, डोके व धड वर उचलावे. पूर्ववत दण्डासनात यावे. आवश्यकता असल्यास या आसनाची २-३ वेळा पुनरावृत्ती करावी.
लाभ : या आसनात पाठीचा कणा भरपूर ताणला जातो. पोट व ओटीपोट यांवर दाब पडतो. पवन अर्थात प्राणाला सुषुम्नेद्वारा प्रेरणा मिळते. हे आसन नेहमी केल्यास पोट सुटत नाही. सुटलेले पोट कमी होते (हठप्रदीपिका १.२९). मेरुदंडाची लवचिकता कायम टिकते. खांदे, मांड्या यांचे स्नायुबंध बळकट होतात. पचनशक्ती वाढते. स्त्रियांसाठी तसेच मधुमेही व्यक्तींसाठी हे आसन उपयुक्त आहे. ह्या आसनाचा निरंतर अभ्यास केल्यास स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात. मानसिक शांती व सहनशीलता वाढते. मनाची चंचलता कमी होते. एकाग्रता वाढते.
Source : Google
Post a Comment