माझे आवडते शिक्षक
शिक्षक हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचे व्यक्ती असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत "गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा" अशा पद्धतीने शिक्षकाला देवाचा दर्जा दिला गेला आहे. शिक्षक विद्यार्थ्याला शिक्षित करून चांगला नागरिक बनवतात. शिक्षक विद्यार्थ्याचे चरित्र, सवयी आणि करिअर घडवितात. एक शिक्षकच आपल्या विद्यार्थ्यामध्ये विचार करण्याची क्षमता विकसित करतो. आणि त्यांना आपल्या जीवनातील ध्येय प्राप्त करण्यात मदत करतो. प्रत्येक शिक्षकाची हीच इच्छा असते की त्यांचे विद्यार्थी जास्तीत जास्त प्रगती करून आपल्या शिक्षकांची मान अभिमानाने उंच करो. माझ्या शालेय जीवनात देखील असेच एक शिक्षक मला लाभले आहेत, ज्यांचे महत्त्व माझ्या जीवनात अनन्यसाधारण आहे.
माझ्या शाळेचे नाव छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय आहे व माझ्या आवडत्या शिक्षकांचे नाव शिवाजी सावंत सर असे आहे. ते आम्हाला मराठी विषय शिकवतात. मी त्यांचे व्यक्तिमत्व, शिकवण्याची पद्धत आणि स्वभावाने खूप प्रभावित झालो आहे. ते अतिशय प्रेमळ आणि दयाळू आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता ते सर्व विद्यार्थ्याची काळजी घेतात. शिवाजी सावंत सरांची मराठी व्याकरणावर विशेष पकड आहे. त्यांनी शिकवलेली कविता आणि धडे पुन्हा अभ्यासायची आवश्यकता पडत नाही. शिवाजी सर विद्यार्थ्यांशी गुरु शिष्याप्रमाणे न वागता एका मित्राप्रमाणे वागतात. अभ्यासाव्यतीरिक्त त्यांनी मला खाजगी समस्यामध्येही नेहमीच मदत केली आहे.
शिवाजी सावंत सर स्वभावाने जरी प्रेमळ असले. तरी ते कायम असेच प्रेमळ नसून वेळ आल्यावर रागावणारे देखील आहे. त्यांना शिस्त खूप प्रिय आहे. जर कोण्या विद्यार्थ्याने कारण नसतांना वेळेवर अभ्यास पूर्ण केला नाही तर ते त्याला शिक्षाही करतात. सर उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचे मराठी भाषेतील ज्ञान पण खूप सखोल आहे. या शिवाय त्यांना इतर खूप साऱ्या चालू घडामोडीची माहिती देखील असते. ह्या चालू घडामोडी आणि यासारखी खूपसारी उपयुक्त माहिती गोष्टींच्या माध्यमाने सांगून ते आमचे सामान्य ज्ञान वाढवतात.
शिवाजी सावंत सर आम्हाला फक्त पुस्तकी अभ्यासच न शिकवता शाळेत आयोजित होणाऱ्या खेळ तसेच स्पर्धा मध्ये देखील भाग घ्यायला प्रोत्साहित करतात. ते आम्हाला नेहमी हसत खेळत शिक्षण देतात. शिवाजी सावंत सरांनी शिकवलेले धडे लवकर लक्षात रहातात. सरांमुळेच माझ्यात मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण होऊन मला लेखनाची आवड लागली आहे. शिवाजी सर माझ्यासाठी तसेच माझ्यासारखी इतर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहेत. माझ्या जडणघडणीत त्यांचे योगदान नेहमीच महत्वाचे राहील.
स्त्रोत : इंटरनेट
मराठी विषयातील इतर निबंध पाहण्यासाठी क्लिक करा
Post a Comment