ताडासन
ताडाचे झाड त्याच्या उंचीकरीता प्रसिद्ध आहे. या आसनात शरीराची अंतिम स्थिती ही ताडाच्या झाडाप्रमाणे उंच भासते, म्हणूनच या आसनाला ‘ताडासन’ असे नाव आहे.
ताडासन
कृती : आसनपूर्व स्थितीसाठी दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवून दोन्ही तळहात दोन्ही मांड्यांजवळ ठेवून आरामात उभे रहावे. आसनपूर्व स्थितीमधून सावकाश दोन्ही पाय एकत्र घ्यावेत. ताडासन हे उभे राहून करावयाचे आसन असल्याने दोन्ही पाय एकत्र घेताना पायाचे अंगठे, टाचा, गुडघे एकमेकांजवळ करून सरळ उभे रहावे. दोन्ही हात शरीराजवळ सरळ ठेवावेत. आपली नजर डोळ्यासमोरील कुठल्याही काल्पनिक स्थिर बिंदूवर केंद्रित करावी. श्वास घेत हळूहळू दोन्ही हात शरीरासमोरून सरळ रेषेत वर घेत घेत टाचाही त्याच लयीत जमिनीपासून वर उचलाव्यात. दोन्ही हात पूर्ण वर गेल्यावर बाहू कानाजवळ येतील आणि हाताची बोटे आकाशाच्या दिशेला सरळ राहतील आणि टाचा वर उचलल्यामुळे आपण चवड्यांवर उभे असू. सर्व शरीराला वरच्या दिशेने ताण देऊन खेचून घ्यावे. सर्व शरीराचा भार चवड्यांवर तोलून धरावा. चेहरा सरळ ठेवून लक्ष स्थिर बिंदूवरच केंद्रित करावे किंवा शक्य असल्यास व तोल जात नसल्यास डोळे बंद करून प्राणधारणेचा अभ्यास करावा. प्राणधारणा म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करणे. आसनाच्या अंतिम स्थितीत श्वासाची गती नैसर्गिक असावी. ही ताडासनाची अंतिम स्थिती आहे. हे एक प्रकारचे संतुलन आसन आहे.
आसनातून बाहेर येण्यासाठी सावकाश डोळे उघडून टाचा आणि हात एकत्र हळूहळू एकाच लयीत जमिनीच्या दिशेने घेऊन यावेत. हात शरीराच्या बाजूला व टाचा जमिनीवर आल्यानंतर दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून आसनपूर्व स्थितीत उभे रहावे.
लाभ : हे आसन केल्यामुळे मणक्यांमधील रक्ताभिसरण सुधारते. मणक्यांमधील नाड्यांच्या जोड्या उत्तेजित होतात. मेरुदंडाचा लवचिकपणा वाढतो व त्यामुळे मणक्यांवरील अनावश्यक दाबामुळे निर्माण झालेले मेरुदंडाचे किरकोळ आजार व दोष नाहीसे होतात. वाढत्या वयामध्ये (वय वर्ष १४ ते १८) दररोज ताडासनाचा अभ्यास केल्यामुळे उंची वाढण्यास मदत होते. पायातील अशुद्ध रक्तवाहिन्यांचे काम सुधारते. शरीरातील आळस निघून जातो व ताजेतवाने वाटते. मनोकायिक तोलक्षमता वाढते.
إرسال تعليق